आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पश्चिम महाराष्ट्र

INDAPUR BREAKING : म्हसोबावाडी दुर्घटनेतील दोन कामगारांचे मृतदेह बाहेर काढले; ६८ तासांच्या प्रयत्नांनंतर एनडीआरएफ पथकाला यश..!

पश्चिम महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

इंदापूर : प्रतिनिधी  

विहिरीच्या रिंगचे काम सुरू असताना मातीचा मलबा कोसळून गाडले गेलेल्या चारपैकी दोन कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफ पथकाला यश आले आहे. मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर एनडीआरएफ पथकाकडून जोरदार शोधमोहीम सुरू होती. तब्बल ६६ तास प्रयत्न केल्यानंतर एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर दुसऱ्याही कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफ जवानांना यश मिळाले आहे.

मंगळवारी रात्री इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथील एका विहीरीच्या रिंगचे काम सुरू असताना मातीचा मलबा कोसळून चार कामगार गाडले गेल्याची घटना घडली. यामध्ये सोमनाथ लक्ष्मण गायकवाड, जावेद अकबर मुलाणी, परशुराम बन्सीलाल चव्हाण आणि मनोज मारुती सावंत (सर्व रा. बेलवाडी, ता. इंदापूर) हे चार कामगार अडकले होते. या घटनेनंतर प्रशासनाने या चारही कामगारांच्या शोधासाठी मोहीम राबवली.

बुधवारी सकाळी एनडीआरएफची दोन पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांच्याकडूनही विविध पद्धतीने या कामगारांचा शोध घेणं सुरू होतं. बुधवारी सायंकाळपर्यंत या शोधमोहिमेत काहीही हाती लागलं नव्हतं. मात्र विहीरीतील माती काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होतं. गुरुवारीदेखील या पथकाने छोट्या पोकलेन मशीन विहिरीत सोडून या कामगारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसेच विहीरीतील पाणीही उपासण्यात आले होते.

विहीरीची खोली जवळपास १२५ फुट असल्यामुळे शोधकार्यात अडथळे येत होते.  अखेर आज सकाळी एक मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर दोन तासांनी आणखी एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. हे मृतदेह शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आता या पथकाकडून इतर कामगारांचा शोध घेतला जात आहे.


ह्याचा प्रसार करा
पश्चिम महाराष्ट्र
Back to top button
Contact Us