
बारामती : प्रतिनिधी
रविवारी विरोधी पक्षनेते अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आले होते. या दरम्यान, एका कार्यक्रमात ग्रामस्थांनी अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली. त्यावर अजितदादांनी पोलिस यंत्रणेला चांगलंच खडसावलं. आता शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हेच हे सगळे धंदे बंद करतील आणि पोलिस निवांत राहतील अशा शब्दात नाराजी व्यक्त करत त्यांनी प्रसंगी मी दारुची भट्टी चालवत असेल तर मलाही टायरमध्ये टाका असे आदेशच पोलिस यंत्रणेला दिलेत.
मागील काही दिवसात बारामतीत पोलिस यंत्रणा कुचकामी ठरल्याचे पहायला मिळते. त्यातूनच अजितदादांनी अनेकदा जाहिरपणे तर काही वेळेला खासगीत वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. मात्र तरीही पोलिसांच्या कार्यपद्धतीत फरक पडताना दिसत नाही. त्यामुळे सातत्याने नागरीकांकडून अजित पवार यांच्याकडे तक्रारी होताना दिसत आहेत.
बारामतीत पोलिस यंत्रणा असो किंवा अन्य शासकीय विभाग. त्या ठिकाणी ना. अजित पवार हे अधिकाऱ्यांना मोकळीक देतात. त्यांच्या कामात कोणताही हस्तक्षेप केला जात नाही. माझ्या जवळचा कार्यकर्ता चुकला तरी त्याची हयगय करु नका अशी स्पष्ट भूमिका अजितदादा घेतात. त्यामुळे पोलिस यंत्रणेवर दबाव तंत्र किंवा अन्य गोष्टींचा ताण राहत नाही.बारामती शहर आणि तालुक्यात कायदा सुव्यवस्था राहावी, नागरीकांना सुरक्षितता वाटावी हा अजितदादांचा हेतू असतो.
काल पाहुणेवाडीत एका कार्यक्रमादरम्यान अजितदादांकडे अवैध धंदे बंद करण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे अजितदादांनी पोलिस यंत्रणेला खडे बोल सुनावले. ही कामे आता आम्हीच करायची का असा सवाल करत पोलिसांनी निवांत रहावं.. तुम्हाला तर माझा सॅल्युटच आहे अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. एवढ्यावरच न थांबता मी जरी अवैध धंदे करत असेल तर मलाही टायरमध्ये घाला असंही सांगायला ते विसरले नाही.
अजितदादांना अभिप्रेत कारवाई गरजेची..!
एकूणच काय तर शहर आणि तालुक्यात चुकीच्या कामांना थारा नको ही स्पष्ट भुमिका अजितदादांनी जाहीर केली आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेनेही तितक्याच पारदर्शकपणे कारवाई करायला हवी एवढीच अपेक्षा नागरीक व्यक्त करतात. गुन्हेगारीवर वचक ठेवणारे अधिकारी बारामतीत आणण्यावर अजितदादा नेहमीच प्राधान्य देतात.
बारामतीत कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबरच अवैध धंद्यांना लगाम लागला पाहिजे असं अजितदादा नेहमीच जाहीर भाषणात बोलतात. एखादा चुकीचा असेल तर त्यावर कारवाईलाही मागेपुढे पाहू नका हेही सांगतात. त्यामुळे पोलिस यंत्रणेनं तितकीच तत्परता दाखवून अजितदादांना अभिप्रेत काम करण्याची गरज या निमित्ताने व्यक्ती होत आहे.