बारामती : प्रतिनिधी
दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने नोव्हेंबर महिन्यात भरदिवसा एका हॉटेलमध्ये जाऊन हॉटेलचालक व कामगारांना तलवारीने वार करून पैसे उकळणाऱ्या टोळीवर बारामती शहर पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीत पाच जणांचा समावेश असून विविध गुन्ह्यात त्यांचा सहभाग होता.
दि. ११ नोव्हेंबर रोजी बारामती शहरातील कसबा येथील फलटण चौकातील हॉटेल दूर्वाज् येथे सराईत गुन्हेगार आदेश संजय कुचेकर, साहिल शिकीलगार, ऋषिकेश चंदनशीवे, तेजस बच्छाव आणि यश जाधव यांनी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने राडा केला होता. त्यामध्ये हॉटेलची तोडफोड करत हॉटेलचालक व कामगारांवर तलवारीने हल्ला करत पैसे उकळले होते. या घटनेत फिर्यादीच्या डोक्यात १३ टाके पडले होते.
या घटनेनंतर बारामती शहर पोलिस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३०७, ३८४, ४२७, १४३, १४७, १४९ आणि शस्त्र अधिनियम ४ (२५) नुसार गुन्हा दाखल करत या सर्व आरोपींना अटक केली होती. हे आरोपी सध्या येरवडा कारागृहात आहेत. यापूर्वीही या टोळीने दहशत निर्माण करण्यासाठी गुन्हे केले होते. कायद्याचा धाक राहिला नसल्यामुळे या टोळीवर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाईसाठी पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी प्रस्ताव पाठवला होता.
या प्रस्तावाला विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी तात्काळ मंजूरी दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी यासाठी विशेष सहकार्य केले. आता या गुन्ह्यात मोक्का कायद्याच्या कलमांचा समावेश करून पुढील तपास केला जाणार आहे. यापुढेही ही कारवाई सुरू राहणार असून दहशत निर्माण करणाऱ्यांवर मोक्का कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी सांगितले.