
बारामती : प्रतिनिधी
बारामती शहर आणि एमआयडीसी परिसरात शनिवारी मद्यधुंदावस्थेत तलवारी आणि कोयत्याच्या सहाय्याने दहशत माजवत तोडफोड आणि दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना बारामती शहर आणि तालुका पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीवर बारामती शहर आणि तालुका पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील फरार असलेल्या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली.
काल सायंकाळी बारामती एमआयडीसीतील हॉटेल कोमल येथे दारू पिऊन ६ ते ७ तरुणांच्या टोळक्याने कोयता आणि तलवारीचा धाक दाखवत तोडफोड केली होती. त्यानंतर बारामती तालुका पोलिसांनी अनिश सुरेश जाधव (वय २०, रा. प्रगतीनगर, बारामती) आणि पियुष मंगेश भोसले (वय १९, रा. आमराई, बारामती) या दोघांना ताब्यात घेण्यात आले होते.
त्यानंतर उर्वरीत आरोपी चेतन कांबळे, विशाल माने, चिराग गुप्ता, प्रथमेश मोहरे व एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असलेल्या टोळक्याने तांदुळवाडीत एका मोबाईल दुकानाचीही तोडफोड केली. बारामती शहरातील सराफ पेट्रोलपंपावर दोन हजार रुपयांचे पेट्रोल टाकून पैसे मागणाऱ्या कर्मचाऱ्यासह मध्यस्थी करणाऱ्या ग्राहकावरही या टोळक्याने वार केले. त्यानंतर या टोळक्याने आपला मोर्चा टीसी कॉलेजकडे वळवला. टीसी कॉलेजसमोरील कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या पॉर्न स्नॅक्स सेंटरमध्ये घुसून राडा केला. त्या ठिकाणी एका कामगाराला मारहाण करत गल्ल्यातील ४२०० रुपये काढून नेले.
या घटनेमुळे बारामतीत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधितांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी लागलीच पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांच्या अधिपत्याखाली पथक रवाना केले होते.
यातील एका अल्पवयीन मुलासह चिराग गुप्ता, प्रथमेश मोहरे या तिघांना राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पळून जात असताना पकडण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, उमेश दंडिले, कुलदीप संकपाळ, तपास पथकातील दशरथ कोळेकर, अशोक सिताप, तुषार चव्हाण, दशरथ इंगवले, शाहू राणे, राऊत, देवकर, दळवी यांच्या पथकाने तात्काळ आरोपींचा पाठलाग करत तिघांना ताब्यात घेतले.
चेतन कांबळे, विशाल माने, शामवेल उर्फ गोट्या जाधव हे आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत. पोलिसांनी या आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना केले असून लवकरच हे आरोपी जेरबंद होतील, असे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी सांगितले.