सातारा : प्रतिनिधी
राज्यातील राजकीय भाषेचा दर्जा ढासळताना दिसत आहे. महायुतीमधील नेत्यांना विरोधकांवर टीका करताना बोलण्याचे भान नसल्याचे दिसून येत आहे. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर अपशब्दात टीका केली होती. ही घटना ताजी असतानाच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ‘भोंदू बाबा’ म्हटले आहे.
साताऱ्यात पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी पातळी सोडून टीका केली. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला. त्यामुळे उद्धव ठाकरे हे सध्या त्यांच्यासारखा विचार करायला लागले आहेत. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील भोंदू बाबा आहेत. भोंदू बाबाच्या ताब्यात कोणी आले, तर सुटत नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचाही समाचार घेतला. ते म्हणाले, जयंतरावांनी आता काळजी करू नये. त्यांनी स्वप्न पाहण्याचे सोडून द्यावे. त्यांना आम्ही पुन्हा सत्तेत येऊन देणार नाही. पुढच्या निवडणुकीमध्ये आमचे २०० आमदार निवडून येतील, असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला.