सोलापूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे -फडणवीस सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा केला. तसेच विधानसभेची विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही जोपर्यंत शिंदे फडणवीस सरकारकडे संख्याबळ आहे, तोपर्यंत सरकार टिकणार असल्याचे म्हटले आहे. मात्र याउलट शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बारा आमदार फुटणार असल्याचा दावा केला आहे.
सोलापुरात बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे बारा आमदार फुटले आहेत. केवळ मुहूर्त ठरण्याचा बाकी आहे.तसेच सोलापुरातील एक मोठा नेता देखील आहे. सगळं काही ठरलेलं आहे. थोडसं थांबा, असं त्यांनी म्हटलं आहे.
राज्यातील १७० आमदार शिंदे-फडणवीस सरकारच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहेत. सगळे आमदार आपल्या मतदारसंघांमध्ये काम करत आहेत. सगळ्यांना कामासाठी निधी मिळत असल्याचे जनतेला दिसत आहे, असे शहाजीबापू पाटील म्हणाले.