बारामती : प्रतिनिधी
विरोधी पक्षनेते अजित पवार हे उद्या बारामती दौऱ्यावर येत आहेत. पहाटे विकासकामांची पाहणी केल्यानंतर सकाळी ८ वाजता ते विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत. तसेच विद्या प्रतिष्ठान या संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांनाही अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
अजितदादा सकाळी ६ ते ८ या वेळेत बारामती शहर आणि परिसरातील विविध विकासकामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी ८-१५ वाजता पाटील ग्रूप या कर सल्लागार कार्यालयाचे उदघाटन होणार आहे. सकाळी ८-४५ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास ते उपस्थित राहतील.
सकाळी ९ वाजता विद्या प्रतिष्ठान व्हीआयआयटी परिसरात जनता दरबार होणार असून त्यामध्ये अजितदादा नागरिकांच्या भेटी घेणार आहेत. सकाळी १० वाजता गदिमा सभागृहात विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तर सायंकाळी ६.३० वाजता पुण्यातील बाणेर येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत दिवाळी सरंजाम वितरण समारंभ होणार आहे.