बारामती : प्रतिनिधी
एखाद्या विद्यार्थ्यानं कोणत्याही परिक्षेत किंवा स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेकडून सत्कार केल्याचं आपण पाहतो. मात्र विद्या प्रतिष्ठानच्या मगरपट्टा स्कूलमधील भार्गव कोल्लापल्ले याला स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी ध्वजारोहणाचा मान देत संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार यांनी अनोखं गिफ्ट दिलं.
विद्या प्रतिष्ठानच्या मगरपट्टा पब्लिक स्कूलचा विद्यार्थी भार्गव कोल्लापल्ले याने दहावीच्या सीआयएससीई आयसीएसई बोर्ड परिक्षेत देशात तिसरा क्रमांक मिळवला आहे. भार्गवच्या या यशाबद्दल बारामतीत विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विशेष सत्कार आयोजित करण्यात आला होता.
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर भार्गवच्या सत्काराचे नियोजन करण्यात आले होते. मात्र सुनेत्रा पवार यांनी भार्गवला ध्वजारोहण करण्याची संधी दिली. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना ध्वजारोहण करण्याची संधी मिळणं ही भार्गवसाठी एखाद्या सत्कारापेक्षाही मोठी गोष्ट होती.
ध्वजारोहणाची संधी सहसा कुणाला मिळत नाही. मात्र आपल्या संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्याला ही संधी देत सुनेत्रा पवार यांनी मनाचा मोठेपणा दाखवून दिला. त्याचवेळी त्याच्या यशाबद्दल वेगळं गिफ्ट देत त्याचं कौतुकही सुनेत्रा पवार यांनी या निमित्तानं केलं.