सातारा : प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यात महाराष्ट्राला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वाद विकोपाला गेल्यानं धाकट्या भावानं थोरल्या भावाच्या १० महिन्यांच्या बाळाला विहिरीत फेकून दिल्याची घटना घडली. सातारा-रहीमतपूर रस्त्यावर ही घटना घडली. विशेष म्हणजे या विकृताने आपल्या मोठ्या भावाला स्वत: फोन करून या घटनेची माहिती देत पोबारा केला.
याबाबत माहिती अशी की, साताऱ्यातील एका कुटुंबातील दोघा भावांमध्ये वाद सुरू होते. त्यातून त्यांच्यात सतत कुरबुरी सुरू होत्या. आज लहान भावाने थोरल्या भावाच्या १० महिन्यांच्या बाळाला दुकानात नेत असल्याचं सांगून सातारा-रहीमतपूर रस्त्यावर नेले. त्यानंतर त्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत या बाळाला फेकून दिले. एवढ्यावरच न थांबता या विकृताने आपल्या कृत्याची माहिती थोरल्या भावाला फोन करून दिली.
धाकट्या भावाच्या फोननंतर घाबरलेल्या मोठ्या भावाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संबंधित बाळाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस पोहोचेपर्यंत या बाळाचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या घटनेनंतर विकृत आरोपी फरार झाला असून पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.