बारामती : प्रतिनिधी
घरफोडी करणारी आणि दुचाकी चोरणारी टोळी पकडल्यानंतर बारामती तालुका पोलिसांनी आणखी एक धडाकेबाज कामगिरी केली आहे. शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पंप व शेतीची अवजारे चोरणाऱ्या टोळीला तालुका पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १४ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
अक्षय बाळासो हुले (वय:२६ वर्ष), अक्षय लक्ष्मण घोलप (वय:१९ वर्ष), अभिषेक दत्तात्रय गावडे (वय :१९ वर्ष) हे सर्व (रा. मेडद, ता. बारामती) व संतोष जगन्नाथ खांडेकर (वय:३७, रा. जळगाव क .प . ता.बारामती) या चौघांना बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पंप, शेतीच्या मशागतीसाठी वापरात येणारी अवजारे चोरी करणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला होता. या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी संबंधित टोळीची शोधमोहीम हाती घेतली. अखेर पोलीस पथकास या चोरट्यांना पकडण्यात यश आले.
या गुन्ह्याचा तपास चालू असताना आरोपींकडे २ इंजिन व ११ पाण्यातील मोटार व एक शेतीच्या मशागतीसाठी वापरण्यात येणारा कल्टीवेटर मिळून आला आहे. कऱ्हावागज, मेडद, माळेगाव, गोजुबावी, सोनगाव, पारवडी या भागात या चोरीच्या घटना घडल्या आहेत.
चोरी केलेल्या वस्तूंची वाहतूक करण्यासाठी आरोपी अभिषेक गावडे यांच्या मालकीचा छोटा टेम्पो ते वापरत असल्याचे निदर्शनात आले आहे. बऱ्याच दिवसापासून ही टोळी सक्रिय होती. शेतातील पाण्याचे पंप व शेती कामासाठी लागणारे अवजारे चोरी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. या टोळीचा पर्दाफाश केल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या आरोपींनी बारामती आणि परिसरात केलेल्या १४ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राम कानगुडे, पोलीस नाईक अमोल नरूटे, रणजीत मुळीक, पोलीस नाईक गावडे, पो. कॉ. प्रशांत राऊत यांनी ही कारवाई केली.