बारामती : प्रतिनिधी
जिद्द चिकाटी व आत्मविश्वासा च्या जोरावर यश हमखास मिळविता येते हे दाखवून दिले आहे हॉटेल सिटी इनचा सुरक्षा रक्षक सूरज पाटील याने. सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या सूरजची राज्य राखीव पोलीस दलात जवान म्हणून निवड झाली आहे.
मराठा सिक्युरिटी सर्व्हिसेसचा गार्ड म्हणून सूरज पाटील गेली आठ वर्षापासुन सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. सूरज हा मूळचा पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथील असून नियमित नोकरी, पोलीस भरतीचा अभ्यास आणि सराव हा त्याचा दिनक्रम चालू होता.
घरची परिस्थिती खूप हलाखीची, वडील शेतमजूर, आईची हृदयाची शस्त्रक्रिया, दरमहा पाच हजार रुपयांच्या गोळ्या-औषधाचा खर्च, शिक्षणाचा खर्च तो काम करून भागवत होता. प्रामाणिक व होतकरू तरुणास नोकरी देऊन यश मिळवण्यास सहकार्य केल्याचे समाधान वाटत असल्याचे प्रवीण जगताप यांनी सांगितले.
निवडीबद्दल मराठा इंटेलिजन्स सिक्युरिटी सर्व्हिसेसचे शाखा व्यवस्थापक प्रवीण जगताप, हॉटेलचे व्यवस्थापक राजीव निमकर, मेजर किसन लोखंडे, फिल्ड ऑफिसर सोमनाथ पिसाळ, पर्यवेक्षक बापू खांडेकर, व्ही आर बॉयलऱचे संचालक राजाराम सातपुते आदीनी केला.
स्पर्धा परीक्षेची सुद्धा तयारी करीत असून लवकरच अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होईल असे सूरज पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.