जेजुरी : प्रतिनिधी
अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या विकास आराखड्याला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात ११० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असून त्यातून जेजुरी मंदिराचा कायापालट होणार आहे. विकास आराखड्याला मंजूरी दिल्यामुळे जेजुरी देवस्थान ट्रस्टने राज्य शासनाचे आभार मानले आहेत.
जेजुरी तीर्थक्षेत्राचे जतन व संवर्धन करणे तसेच मंदिराच्या संकुलाचे संवर्धन करतांना या परिसराचाही विकास करणे, भाविकांसाठी सोयी सुविधा निर्माण करणे, जेजुरी व आसपासच्या ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन व संवर्धन करणे यासाठी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली.
जेजुरी विकास आराखड्याबाबत झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात सुमारे ११० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
दरम्यान, राज्य शासनाकडून विकास आराखड्याला मंजूरी मिळाल्यामुळे जेजुरीतील अनेक कामे मार्गी लागणार आहेत. मंदिराच्या डागडुजीसह परिसर विकासाची अनेक कामे या निधीतून होतील असे जेजुरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त संदिप जगताप यांनी सांगितले.