बारामती : प्रतिनिधी
बारामती एमआयडीसीतील आयएसएमटी कंपनीत लोखंडी रॉड डोक्यात पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संतोष देवकाते (वय ३०) असे या कामगाराचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बारामती एमआयडीसीमध्ये आयएसएमटी या कंपनीत लोखंडी पाईप तयार केले जातात. संतोष देवकाते (रा. मेखळी, ता. बारामती) हे या कंपनीत कंत्राटी तत्त्वावर काम करत होते. आज सकाळी ते काम करत असताना अचानक एक लोखंडी रॉड त्यांच्या डोक्यात पडला. त्यामध्ये ते गंभीररीत्या जखमी झाले.
त्यांना उपचारासाठी बारामतीतील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेनंतर देवकाते यांच्या नातेवाईकांनी कंपनी व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप जीव गेल्याचा आरोप केला आहे. कंपनीकडून सुरक्षितता पाळणे आवश्यक असताना कामागरांना कसलीही संरक्षक उपकरणे दिली नसल्याचा दावा देवकाते यांच्या नातेवाईकांनी केला आहे.