बारामती : प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. अशातच शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंद बाग आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर मुंबई उच्च न्यायालयाने काल तोडगा काढत २२ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले. शासनानेही कर्मचाऱ्यांवर कारवाई करु नये असेही निर्देश दिले. त्यानंतर आज अचानकपणे एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानासमोर आंदोलन केले.
या आंदोलनादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनीही या कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांनी आक्रमक भुमिका घेतली. या आंदोलनाचे राज्यभरात पडसाद उमटत असून आता शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग निवासस्थानीही पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गोविंद बाग आणि सहयोग या दोन ठिकाणी पोलिसांची अतिरिक्त तुकडी तैनात करण्यात आली आहे.