
मुंबई : प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेल्या पेनड्राईव्ह बॉम्बने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा शोध सीआयडीकडे जातो न जातो तोच आता त्यांनी दुसरा बॉम्ब टाकला आहे. मात्र यावेळी त्यांनी हा बॉम्ब बारामतीमधील निवृत्त पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्या कथित संपत्तीबद्दल टाकला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे बारामती कनेक्शन जोडल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी बागवान यांच्या बारामती शहरातील ४२ एकर जमिनीसंदर्भात आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्याच बरोबर त्यांच्या मुंबई आणि पुण्यातील संपत्तीवरील प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या प्रश्नचिन्हामुळे बारामतीसह पोलीस दलाच्या भुवया उंचावल्या आहेत.
विधानसभेत बोलताना फडणवीस म्हणाले, गट क्रमांक ६९ मधील १६ हेक्टर ४८ आर म्हणजे ४२ एकर बिगर शेती जमीन ही बागवान यांची आहे. बारामतीमध्ये एन ए जमिनीच्या दराची कल्पना सगळ्यांनाच आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही याची कल्पना असेल. त्यांची मुंबई आणि अन्य ठिकाणीही संपत्ती आहे. एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडे इतकी संपत्ती येते कशी असा सवाल करत त्यांनी मुंबईतील एक व्यवहार दाऊद इब्राहीमशी संबंधित व्यक्तीशी झाल्याचाही दावा केला आहे.