पुणे : प्रतिनिधी
कोरोना काळातही पुणे महानगर परिसरात सहा महिन्याच्या आत २७ हजार ५०० कोटी रुपयांची घरांची विक्री झाली आहे. यावर्षी जानेवारी ते जुलै या कालखंडात तब्बल ५३ हजार घरांची विक्री झाली आहे. क्रेडाई पुणे मेट्रोच्या ३८ व्या सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आलेल्या ‘पुणे हाउसिंग रिपोर्ट’ मध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
या अहवालानुसार, महानगर क्षेत्रात यावर्षी जानेवारी ते जुलै दरम्यान, तब्बल २७ हजार ५०० कोटी रुपये किमतीच्या ५३ हजार घरांची विक्री झाली आहे. महानगर क्षेत्रातील हिंजवडी, बालेवाडी, ताथवडे, वाकड, बाणेर, पिंपरी चिंचवड आणि सुस या भागात घर खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी जास्त पसंती दर्शवली आहे. या भागात तब्बल ७ हजार कोटी रुपयांचे घरे विकली गेली आहेत. एकूण विक्रीच्या २७% घरे या भागातून विकली गेलेली आहेत आणि त्याचसोबत पिंपरी-चिंचवडमध्ये २३.५ टक्के घर विक्री झाली आहे. घर विक्री करताना आकार आणि मूल्य यावर भर देण्यात आला आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या अहवालाच्या प्रकाशन सोहळ्यास महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, संचालक अतुल गाडगीळ, सीआरई मॅट्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गुप्ता, क्रेडाई पुणेचे अध्यक्ष अनिल फरांदे, उपाध्यक्ष मनिष जैन, अमर मांजरेकर, विनोद चांडवानी, आदित्य जावडेकर, रणजित नाईकनवरे राजेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.