पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
इंधनाच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे जगणे असह्य झाले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून दर कमी करण्याबाबत कोणतीच पावले उचलली जात नाहीत. या पार्श्वभूमीवर आज पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या माध्यमातून केंद्र सरकारचा निषेध करत आंदोलन करण्यात आले.
पिंपरी चिंचवडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात राष्ट्रवादीच्या वतीने इंधन दारवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, अर्बन सेलचे अध्यक्ष माधव पाटील, गंगाताई धेंडे, अर्बन सेलच्या समन्वयक सुप्रिया काटे, शबाना पठाण, कविता खराडे, निलेश पुजारी, मुकेश खनके, अक्षय फुगे, स्नेहा शिंदे , जॉन डिसोजा यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.
यावेळी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी केंद्र सरकारच्या असंवेदनशील कारभाराचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. घरगुती गॅससह पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक ताण सोसावा लागत असून खर्चाचे गणित कोलमडले आहे. कोरोनामुळे उत्पन्न घटलेले असताना आता इंधनाच्या दरात वाढ होत असल्याने नवीन संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. परंतु हे सरकार याबाबत कोणतीच उपाययोजना करत नाही. त्यामुळे आता सर्वसामान्य जनताच या सरकारला धडा शिकवेल, असे मत यावेळी सुप्रिया काटे यांनी व्यक्त केले.