मोदीसाहेब, दाढी वाढवण्यापेक्षा जनतेच्या समस्यांकडे लक्ष द्या
बारामती : प्रतिनिधी
देशांपुढे समस्यांचा डोंगर उभा असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाढी वाढवून फिरत आहेत. त्यांनी आता दाढी वाढवण्यापेक्षा जनतेच्या समस्या सोडवण्यावर आणि सोईसुविधा वाढवण्यावर भर द्यावा अशी मागणी करत बारामतीच्या चहावाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चक्क १०० रुपयांची मनीऑर्डर केली आहे.
बारामतीतील इंदापूर रस्त्यावर चहाचा स्टॉल लावणाऱ्या अनिल मोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहित १०० रुपयांची मनीऑर्डरही केली आहे. पंतप्रधान मोदी दाढी वाढवून फिरत आहेत. जर त्यांना काहीतरी वाढवायचे असेल तर लोकांसाठी रोजगार वाढवावा. लोकांसाठी आरोग्य सुविधासह लसीकरणाचा वेग वाढवावा. लोकांची समस्या सुटतील याची काळजी घ्यावी, असे अनिल मोरे यांनी पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.
पंतप्रधान हे देशाचे नेते आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहेच. परंतु सद्यस्थितीत सामान्य जनतेला जो त्रास होत आहे, तो त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आपल्या व्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचवण्याचा उद्देशानं आपण मनीऑर्डर आणि पत्र पाठविल्याचे अनिल मोरे सांगतात.
कोरोना कालावधीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये देण्याची मागणी अनिल मोरे यांनी या पत्राद्वारे केली आहे. याशिवाय पुढील लॉकडाउन लागू केल्यास एका कुटुंबासाठी 30 हजार रुपये द्यावेत असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.