बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील मयूरी महादेव सावंत हिची दुसऱ्यांदा पोलिस उपनिरीक्षकपदावर निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षेत पोलिस उपनिरीक्षक संवर्गातून मयूरीने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. मयूरीच्या या दुहेरी यशामुळे बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ६ जुलै ते १७ जुलै २०२२ या कालावधीत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब २०२१ साठी परीक्षा घेतल्या होत्या. त्याचा निकाल काल जाहीर करण्यात आला. यामध्ये बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील रहिवासी असलेल्या मयूरी महादेव सावंत हिने महिला प्रवर्गात राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणारी मयूरी ही बारामती तालुक्यातील पहिली विद्यार्थीनी ठरली आहे.
यापूर्वीही मयूरीने पोलिस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेत यश मिळवत राज्यात मुलींमध्ये बारावा क्रमांक मिळवला होता. त्यानंतर आता थेट राज्यात प्रथम क्रमांक मिळवत मयूरीने स्वत:चं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. मयूरीने आपले पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण वाघळवाडी येथील उत्कर्ष आश्रमशाळेत पूर्ण केले आहे. तर माळेगाव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयातून अभियांत्रिकी पदवी मिळवली आहे. सध्या ती शासकीय सेवेत कार्यरत आहे.