बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून बारामतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे. सध्या आयुर्वेद महाविद्यालयाचे काम प्रगतीपथावर आहे. त्या पाठोपाठ बारामतीत शासकीय नर्सिंग महाविद्यालय सुरू होणार आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत बारामतीसह जळगाव, लातूर, मिरज (सांगली), नंदुरबार आणि गोंदिया या ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रीमंडळातील अन्य सदस्य उपस्थित होते. या बैठकीत अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये राज्यात नव्याने सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये बारामतीचाही समावेश असून बारामतीत वैद्यकीय शिक्षणाच्या सुविधेसह आता नर्सिंग शिक्षणाची सुविधाही उपलब्ध होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून बारामतीत अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी करण्यात आली. तसेच सध्या मेडद येथे शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे काम प्रगतीपथावर आहे. आज नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यास राज्य मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा बारामतीत उपलब्ध झाल्या आहेत.
राज्य सरकारने आज बारामतीसह राज्यात सहा नवीन नर्सिंग महाविद्यालय उभारण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचे अध्यादेश येत्या काही दिवसांत प्रसिद्ध केले जाणार आहेत. त्यानंतर या महाविद्यालयांची उभारणी सुरू होणार आहे.