पुणे : प्रतिनिधी
आजवर आपण फसवणुकीचे अनेक प्रकार पाहिले आहेत. विविध प्रकारे फसवणुकीच्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडतात. पुण्यात मात्र एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेलने मटणाची उधारी थकवत मटण विक्रेत्याची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, तब्बल ६१ लाख रुपयांची उधारी न दिल्यामुळे हा गुन्हा दाखल झाला आहे.
पुण्यातील बागबान हॉटेलचे मालक फजल यूसुफ बागवान आणि अहेतेशाम आयाज बागवान या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, संबंधित मटण विक्रेत्याचे पुण्यातील लष्कर परिसरातील शिवाजी मार्केटमध्ये दुकान आहे. यातून तो बागबान हॉटेलला मटण पुरवत होता. या विक्रेत्याने २०१९ ते २०२३ या काळात २ कोटी ९१ लाख ८१ हजार रुपयांचे मटण पुरवले.
संबंधित हॉटेल मालकाने या मटण विक्रेत्याला २ कोटी ३० लाख १९ हजार रुपये एवढीच रक्कम परत केली. मात्र उर्वरीत ६१ लाख ६२ हजार रुपये देण्यास या मालकांकडून टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे या मटण विक्रेत्याने पोलिसांत धाव घेत फसवणुकीची तक्रार दिली. त्यानुसार लष्कर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पुण्यातील बागबान हे हॉटेल अतिशय प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पुणेकरांची मोठी गर्दी होत असते. अशा या प्रसिद्ध हॉटेलकडून मटणाची उधारी न दिल्यामुळे गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे सध्या या हॉटेलसह मटणाच्या उधारीचीच चर्चा अधिक रंगू लागली आहे.