पुणे : प्रतिनिधी
पुणे शहराला सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं. मात्र याच शहरात एक धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फसणारी घटना समोर आली आहे. शहरातील मुंढवा येथील एका अल्पवयीन कर्णबधीर मुलीवर तिच्या भावासह दोघांनी वेळोवेळी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत कर्णबधीर शाळेच्या महिला शिक्षिकेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर रजाने (वय ३०, रा. उंड्री, पुणे), राहुल पाटील (वय २३) आणि पीडितेचा १४ वर्षीय भाऊ अशा तिघांवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत मुलगी १७ वर्षांची आहे. ती वास्तव्यास असलेल्या घरी आरोपी सागर रजाने याने तिच्यावर जबरदस्ती करत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिला मारहाण करत कोणाला काही सांगितले तर मारून टाकण्याची धमकी दिली.
त्यानंतर तिच्या अल्पवयीन भावानेही ती घरात एकटी असल्याचा फायदा घेत तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले. याच दरम्यान पीडितेचा मित्र राहुल पाटील याने तिला लग्नाचं आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. २०१८ पासून सुरू असलेल्या या प्रकाराला कंटाळलेल्या पीडितेने आपल्या शाळेतील शिक्षिकेला याबद्दल माहिती दिली. त्यानंतर संबंधित शिक्षिकेने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.