बारामती : प्रतिनिधी
बारामतीतील रेड बर्ड या वैमानिक प्रशिक्षण संस्थेच्या विमानाचा दोनवेळा अपघात झाला होता. त्यानंतर या संस्थेचे उड्डाण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशातच या अपघातांची चौकशी करण्यासाठी आलेल्या पथकाच्या कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी या संस्थेच्या अधिकारी व कर्मचारी अशा नऊजणांवर बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विमान अपघात तपास पथकाचे सहाय्यक संचालक आनंदन पोण्णूसामी यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रेड बर्ड वैमानिक प्रशिक्षण संस्थेच्या करण माने, शक्ती सिंग, हर्ष दागर, रेशम चौधरी, अजुष शर्मा, मृणय रिझवी, राकेश सिंग, मार्क डिसोझा आणि गणेश जगताप या नऊ जणांवर भादंवि कलम ३५३ आणि १८६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, रेड बर्ड प्रशिक्षण संस्थेच्या विमानाचा दि. १९ ऑक्टोबर २०२३ रोजी अपघात झाला. त्यानंतर याच संस्थेचे विमान दि. २२ ऑक्टोबर २०२३ रोजी कोसळले होते. या घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने या संस्थेचा उड्डाण परवाना निलंबित केला आहे. सातत्याने होत असलेले अपघात ही गंभीर बाब असल्यामुळे विमान अपघात तपास पथकाने या संस्थेची चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी या पथकाचे सहाय्यक संचालक आनंदन पोण्णूसामी आणि कणीमोझी वेंधन हे दोघेही दि. २३ नोव्हेंबर रोजी बारामती दाखल झाले.
सलग तीन दिवस चौकशीबाबत कामकाज सुरू होते. २३ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत ही चौकशी झाली. परंतु संबंधित संस्थेकडून तपासकामी कोणतेच सहकार्य झाले नसल्याचे आणि या तपासात अडथळा आणला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून रेड बर्ड वैमानिक प्रशिक्षण संस्थेच्या एकूण नऊ जणांवर बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.