
बारामती : प्रतिनिधी
माझ्या मुलानं माझ्यादेखत राज्याचं मुख्यमंत्रीपद भुषवावं अशी इच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी व्यक्त केली आहे. बारामतीच्या जनतेचं दादावर प्रेम आहे. त्यामुळे पुढे काय होतंय ते बघावं लागेल असंही आशाताई पवार यांनी म्हटलं आहे.
काटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी तथा बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यासह आशाताई पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी अजितदादांनी आपल्या देखतच मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
अशक्तपणा आल्यामुळे आज अजितदादा मतदानाला आले नाहीत असं सांगतानाच पूर्वीची काटेवाडी आणि आताची काटेवाडी यात प्रचंड फरक झाला आहे. माझ्या सुनेने पुढाकार घेऊन गावाचा कायापालट झाल्याचेही त्यांनी नमूद केलं. माझं वय आज ८६ आहे. त्यामुळे माझ्यादेखतच अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं, अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली.
अजितदादांवर लोकांचं प्रेम आहे. त्यामुळे पुढे काय घडेल हे सांगता येत नाही, असंही त्या म्हणाल्या. दरम्यान, आशाताई पवार यांच्या या इच्छेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून अनेकांनी त्यांच्या इच्छेचं समर्थन केलं आहे.