रांजणगाव : प्रतिनिधी
मोठमोठ्या व्यापाऱ्यांना मालाची ऑर्डर देऊन नंतर रस्त्यातच ८० टक्के माल उतरवून घेऊन पैसे न देताच पोबारा करणाऱ्या महाठकाचा रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अनेकांना गंडा घालणाऱ्या या ठकासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून १० लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दीपक गणेश गुगळे (वय २३, रा. वडुले खुर्द, ता. शेवगाव, जि. नगर) आणि शहेबाज जुबेर शेख (वय ३४, रा. भिंगार, जि. नगर) अशी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कारेगावनजीकच्या फलकेमळा येथून दि. ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ऋत्विक मनोहर गिरीधर हे शिरूर येथील बॅटरी व्यावसायिक एका अनोळखी इसमाने दिलेली ऑर्डर घेऊन कारेगाव येथे निघाले होते.
या दरम्यान, एका पांढऱ्या रंगाच्या इरटीगा कारमधून आलेल्या दोन इसमांनी त्यांना दमदाटी करत मारहाणीची धमकी देत त्यांच्याकडील ७७ हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्या जबरदस्तीने चोरून नेल्या होत्या. गिरीधर यांच्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडिसी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी तपास पथकातील सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, उमेश कुतवळ यांना सूचना देत तांत्रिक माहितीच्या आधारे या गुन्ह्याची उकल केली. हा गुन्हा दीपक गुगळे व शहेबाज शेख यांनी केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे अधिक माहिती घेतल्यानंतर त्यांनी या गुन्ह्यासह अन्य गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली इरटीगा कार व अन्य मुद्देमाल जप्त केला आहे. जामखेड, भिंगार, कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतही या महाठकाने गुन्हे केल्याचे समोर आले आहे.
दीपक गुगळे हा जस्ट डायल या वेबसाईटवर फोन करून वेगवेगळ्या परिसरातील बॅटरी, सिलाई मशीन, कपडे विक्रेते, पेंड विक्रेते, तेल विक्रेते यांचे नंबर मिळवून मी अहमदनगर येथील दानशूर व्यक्ती असून मला विविध वस्तू अनाथ आश्रम, वृद्धाश्रम अशा ठिकाणी दानधर्म म्हणून द्यायच्या असल्याचं सांगायचा. संबंधित विक्रेतेही मोठी ऑर्डर असल्यानं तो सांगेल त्या पत्त्यावर माल पाठवायचे. त्यावेळी माल वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाचा नंबर घेऊन दीपक गुगळे व त्याचा साथीदार दिलेल्या पत्त्याच्या अलीकडेच वाहन थांबवून दमदाटी करत ८० टक्के माल उतरवून घ्यायचे.
विशेष म्हणजे उर्वरीत माल उतरवल्यावर सगळी रक्कम देतो असं सांगत ८० टक्के माल घेऊन फोन बंद करून पोबारा करायचे. त्यातूनच त्याने जवळपास पाच ठिकाणी फसवणुकीचे प्रकार केल्याचं समोर आलं आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी या आरोपींकडून ७७ हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्या, ३ लाख रुपये किमतीचे कपडे, ४८ हजार ९०० रुपये किमतीची सरकी पेंड, १९ हजार २०० रुपये किमतीचे तेलाचे डबे आणि ९० हजार रुपये किमतीच्या १८ सिलाई मशीन असा १० लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक मितेश गट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरडे, पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, तेजस रासकर, माणिक काळकुटे, संतोष औटी व वैजनाथ नागरगोजे यांनी ही कामगिरी केली.