बारामती : प्रतिनिधी
बारामती शहर आणि परिसरात बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या ॲकॅडमींना आता चाप लागणार आहे. यामध्ये इमारतींचे फायर ऑडीट न केलेल्या ॲकॅडमी तात्काळ बंद करण्याच्या सुचना तहसीलदारांनी बारामती नगरपरिषदेच्या अग्निशमन अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.आज प्रशासकीय पातळीवर बेकायदेशीर ॲकॅडमीबाबत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक ॲकॅडमींवर मोठी कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.
बारामतीत मागील काही दिवसात बेकायदेशीर ॲकॅडमींचं पेव फुटलं होतं. मनमानी पद्धतीनं शुल्क आकारण्यासह पालक आणि विद्यार्थ्यांची पिळवणुक या ॲकॅडमींच्या माध्यमातून सुरु आहे. याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे मोहसीन पठाण यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. त्यावेळी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून याबद्दल निर्णय घेण्याचं ठरवण्यात आलं होतं.
आज बारामती येथील तहसीलदार कार्यालयात आयोजित बैठकीला नायब तहसीलदार विलास करे, मुख्याधिकारी महेश रोकडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, गटविकास अधिकारी अनिल बागल, गटशिक्षणाधिकारी संपत गावडे, नगरपरिषदेचे अग्निशमन अधिकारी पी. कुल्लरवार यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, आंदोलक मोहसीन पठाण व इतर मान्यवर उपस्थित होते.
ज्या ॲकॅडमींनी फायर ऑडिट केलं नाही आणि ज्यांना नोटीसा देवूनही ऑडिटच केलं नाही अशा ॲकॅडमी बंद केल्या जाणार आहेत. तसेच शिक्षण कायद्यानुसार इमारतींचे ऑडिट नाही अशाही ॲकॅडमीही बंद करण्याच्या सुचना नायब तहसीलदार विलास करे यांनी दिल्या. ज्या ॲकॅडमी बेकायदेशीरपणे बस चालवतात त्यांच्यावरही कारवाई सुरु असल्याचं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी सांगितलं.
अनेक ॲकॅडमींकडून शासनाचा कर मोठ्या प्रमाणात बुडवला जात आहे. त्याबद्दलही या बैठकीत चर्चा करण्यात आली. याबद्दल संबंधित विभागाकडून संबंधितांवर कारवाई करण्याचा निर्णयही घेतला गेला. एकूणच आजच्या बैठकीत विविध शासकीय विभागांकडून ॲकॅडमींच्या मनमानीवर चर्चा करुन कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बेकायदेशीर ॲकॅडमींना चाप बसणार आहे.
जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची अडचण काय..?
जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना आजच्या बैठकीबद्दल सुचना देण्यात आल्या होत्या. परंतु त्या या बैठकीला गैरहजर होत्या. त्या नेमकं कोणत्या कारणामुळे आल्या नाहीत याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत.