आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

कर्तव्यदक्ष पोलिस हवालदार संदिप कदम यांची अकाली एक्झिट; ग्रामीण पोलिस दलासह बारामती परिसर हळहळला..!

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

दौंड तालुक्यातील यवत पोलिस ठाण्याअंतर्गत पाटस पोलिस चौकीत पोलिस हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या संदिप उर्फ संभाजी जगन्नाथ कदम यांचं सोमवारी निधन झालं. शुक्रवारी बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर तीनचाकी टेम्पोने दिलेल्या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर पुणे जिल्हा पोलिस दलासह बारामती पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, सोमवारी रात्री उशीरा संदीप कदम यांच्यावर त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले.

पोलिस हवालदार संदीप उर्फ संभाजी जगन्नाथ कदम (वय ४३, रा. बारामती, मूळ रा. लासुर्णे ता. इंदापुर) हे सध्या पाटस पोलीस चौकीत कार्यरत होते. संदीप कदम हे शुक्रवारी सांयकाळच्या वेळी व्यायामासाठी घराबाहेर पडले होते. बारामती-भिगवण रस्त्यावर बारामती शहरातील हॉटेल समोरीस रस्त्यावरुन संदीप कदम पायी जात असतांना, पाठीमागुन आलेल्या पिवळ्या रंगाच्या तीन चाकी टेम्पोने कदम यांना पाठीमागुन जोरदार धडक दिली. यात ते रस्त्याच्या एका बाजुला फेकले गेले. यात त्यांना डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागला.

या घटनेनंतर स्थानिकांनी त्यांना बारामतीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु डोक्याला मार लागल्यामुळे संदीप कदम यांना पुढील उपचारासाठी बारामतीहुन पुण्यातील खासगी रुग्णालयात हलविले होते. त्यानंतर मागील तीन दिवसापासुन संदीप कदम यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना रविवारी रात्री बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र काल सोमवारी (दि २५) उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री उशीरा संदीप कदम यांच्यावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

इंदापुर तालुक्यातील लासुर्णे या गावचे रहिवाशी असलेल्या संदीप कदम यांनी बारामती शहर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि लोणी काळभोर पोलिस ठाण्यात काम केलं. मागील तीन वर्षांपासून ते पाटस पोलिस चौकीत कार्यरत होते. आपल्या कौशल्यामुळे त्यांनी अनेक गुन्ह्यांची उकल केली होती. आपल्या डॅशिंग स्वभावामुळे गुन्हेगारांवर एक प्रकारे वचक निर्माण केला होता. त्याचवेळी त्यांचा मित्र परिवारही मोठा होता. या दुर्दैवी घटनेनंतर ग्रामीण पोलिस दलासह बारामती परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us