बारामती : प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली असून या बैठकीत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत चर्चा केली जाणार आहे. ही चर्चा होत असताना संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल, प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेणे शक्य होणार नसल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत दिले.
बारामतीत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज ना. अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या बैठकीस प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी आज होत असलेल्या बैठकीबद्दल भाष्य केले.
आज मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोनासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. हा निर्णय घेताना संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच नियम लागू केला जाईल असे सांगून ना. अजित पवार म्हणाले, व्यापाऱ्यांनी सोमवारपासून दुकाने उघडण्याच्या घेतलेल्या भूमिकेबद्दलही या बैठकीत चर्चा होईल. त्याबाबत काय निर्णय झाला हे आज रात्री किंवा उद्यापर्यंत जाहीर केले जाईल.
राज्यात रेमडिसीव्हर इंजेक्शनच्या तुटवड्याबाबत बोलताना अजित पवार यांनी राज्यातील एकाही शासकीय रुग्णालयात तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले. खासगी रुग्णालयांमध्ये सुरू असलेल्या तुटवड्याबाबत चर्चा करून त्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे लवकरच जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.