Site icon Aapli Baramati News

अन अजितदादा म्हणाले, तूच पूजा कर; अनोख्या भेटीमुळं सानिका गेली भारावून..!

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी 

विरोधी पक्षनेते अजित पवार यांना शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाचे व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाते. मात्र अजितदादा तितकेच संवेदनशील असल्याचं अनेकदा पहायला मिळतं. रविवारी झालेल्या बारामतीतील दौऱ्यातही त्यांच्या या स्वभावाची प्रचिती आली. क्रिडा संकुलातील क्रिडा साहित्याच्या पूजनाचा मान खेळाडू युवतीला देत अजितदादांनी अनोखी भेट दिली. दादांच्या या सरप्राईजमुळे सानिका मालुसरे ही युवा खेळाडू भारावून गेली. 

अजितदादा रविवारी बारामती दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान, क्रिडा संकुलात देण्यात आलेल्या वेटलिफ्टींग साहित्याचं पूजन अजितदादांच्या हस्ते होणार होतं. त्यासाठी बारामतीतील युवा खेळाडू सानिका मालुसरे आणि तिचे वडील राजेंद्र मालुसरे हे त्या ठिकाणी उपस्थित होते. 

क्रिडा संकुलात आल्यानंतर या साहित्याबद्दल अजितदादांनी संपूर्ण माहिती घेतली. त्यावेळी सानिकाने अजितदादांना या साहित्याचं पूजन करण्याची विनंती केली. त्यावर त्यांनी तूच पूजन कर असं सांगितलं.. या प्रकारामुळे सानिका काही क्षण भांबावली.. तिनं पुन्हा तुम्हीच पूजन करा अशी आर्जव केली. त्यावर अजितदादांनी मी सांगतोय ना, तूच पूजन कर असा प्रेमळ दम दिला. 

दादांची सुचना शिरसावंद्य मानत सानिकाने या साहित्याचं पूजन केलं. त्यानंतर तिनं वेटलिफ्टींगचं प्रात्यक्षिकही दाखवलं. अजितदादांनी तिची आणि तिच्या वडिलांची विचारपूस करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. काही मिनिटांची ही घटना सानिका आणि तिच्या वडिलांना आश्चर्याचा धक्का देणारी होती. 

अजितदादांच्या या आगळ्यावेगळ्या भेटीचा आनंद शब्दातीत असल्याचं सानिकानं सांगितलं. तर सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलीला क्रिडा साहित्य उपलब्ध करुन देण्यासह पूजनाचा मान देणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असल्याची प्रतिक्रिया राजेंद्र मालुसरे यांनी दिली.

अजितदादांच्या कार्यशैली सर्वश्रूत आहे. त्याचवेळी त्यांच्या संवेदनशील स्वभावाची उदाहरणेही अनेक आहेत. त्यामुळेच क्रिडा साहित्याच्या पूजनाची अजितदादांची ही अनोखी भेट सानिकाला तिच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणारी ठरेल हे मात्र नक्की..! 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version