गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त
बारामती : प्रतिनिधी
अग्निशस्त्र जवळ बाळगल्याप्रकरणी प्रताप अमरसिंग पवार याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या जवळील एक गावठी बनावटीचे पिस्टल, मॅग्झिन व दोन जिवंत काडतुसे असे एकूण २५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल बारामती शहर पोलिसांनी जप्त केला आहे.
पुणे ग्रामीण जिल्हा हा औद्योगिक जिल्हा आहे. आणि या जिल्ह्यांमध्ये अनेक गुन्हेगार अग्नी शास्त्राचा वापर करत आहेत. या विरोधात मोहीम घेण्याबाबत पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार बारामती शहर पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेतली. या दरम्यान पोलीस नाईक दशरथ कोळेकर यांना आरोपी प्रताप पवार हा अग्निशस्त्र बाळगत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार बारामती शहरातील पाटस रस्त्याला जोडणाऱ्या रिंग रोडजवळ राहत असलेल्या प्रताप अमरसिंग पवार (वय २१ वर्ष, रा: बागमळा, जि. खंडवा,मध्यप्रदेश) याच्या घरावर छापा मारण्यात आला. त्यामध्ये एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपीची अधिक चौकशी केली असता, तो मूळचा मध्यप्रदेशमधील असल्याचे सांगून त्याने तिकडूनच हे शस्त्र आणल्याची कबुली दिली.
पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, तुषार चव्हाण, मनोज पवार, अभी कांबळे यांनी ही कारवाई केली.