मुंबई : प्रतिनिधी
शुक्रवारी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही या अर्थसंकल्पाला हजेरी लावली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राज्याच्या अर्थसंकल्पाचे कौतुक करत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अजित पवार यांचा सल्ला घ्यावा, अशी खोचक टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना सुप्रिया सुळे यांनी आवर्जून विधान भवनात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्याचबरोबर अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांच्याशी संवादही साधला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया दिली.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी अर्थसंकल्पाचं आणि अजितदादांच्या कामांचं कौतुक केलं. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजितदादा माझे भाऊ म्हणून कौतुक करत नाही. पण महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी चांगली काटकसर केली आहे. निर्मला सीताराम यांना कधीही अडचणी आल्या किंवा मदत लागली तर त्यांनी अजितदादांचा सल्ला घ्यावा, असा प्रस्ताव मी त्यांना अनेक वेळा संसदेत दिला असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.