मुंबई : प्रतिनिधी
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सोमवारी इफ्फी चित्रपट महोत्सवाचा समारोप पार पडला. यावेळी चित्रपट परीक्षक नदाव लॅपिड यांनी या चित्रपटाला प्रोपोगंडा निर्माण करणारा आणि अश्लील चित्रपट असल्याचे संबोधले आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट एका पक्षाच्या प्रचारासाठी बनवण्यात आला होता, असा गंभीर आरोप केला आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, हा चित्रपट एका पक्षाच्या प्रचारासाठी तयार करण्यात आला आहे. त्यासोबतच दुसऱ्या पक्षाच्या विरोधात प्रचार करणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काश्मीर पंडितावरचे हल्ले अधिकच वाढले. ज्याप्रकारे एका पक्षाने या चित्रपटाचा गाजावाजा केला. त्यानंतर काश्मिरी पंडितांच्या हत्या झाल्या, असा दावाही त्यांनी केला.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, हा चित्रपट केवळ प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आला. ज्यावेळी द काश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची मागणी होऊ लागली. त्यावेळी या चित्रपटाचे निर्माते याबद्दल काहीच बोलत नाही. या चित्रपटाच्या माध्यमातून जमा झालेल्या कमाईतील काही कमाई ही काश्मिरी पंडितांच्या अनाथ बालकांना आणि कुटुंबीयांना देण्यात यायला हवी, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.