कोल्हापूर : प्रतिनिधी
महाविकास आघाडीमध्ये मित्र पक्ष असलेला स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीमधून बाहेर पडली आहे. संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी ही घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकार विरोधात जाहीर भूमिका घेत होते. त्यामुळे ते महविकास आघाडीमधून बाहेर पडणार असल्याचे वेळोवेळी संकेत देत होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोल्हापूर येथे आजच्या झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय झाला. राज्य कार्यकारिणीच्या होणाऱ्या बैठकीनंतर निर्णय घेणार असल्याची राजू शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी आज निर्णय जाहीर केला. यापुढे रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांसाठी लढणार असल्याचे आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
राजू शेट्टी म्हणाले, मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने जाहीर करतो की यापुढे महाविकास आघाडी आणि आमचे संबंध संपले आहेत. पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती त्यांना सांगू. आम्हाला दिल्लीवाल्यांनी फसवले आणि मुंबईवाल्यांनीही फसवले आहे. आता शेतकऱ्यांना आम्हाला आमच्या मनगटावर न्याय मिळवून द्यायचा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे यापुढील काळात राजू शेट्टी यांची भूमिका काय असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.