मुंबई:प्रतिनिधी
गुरुवारी उच्च न्यायालयाने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ आणि राज्य सरकारला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे संतापलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी जोरदार निदर्शने करीत चप्पल आणि दगडफेक करण्याचा प्रयत्न केला.
एसटी कर्मचाऱ्यांचे सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर आंदोलन चालू होते. त्यावेळी पोलिसांचा फौजफाटा कमी असल्याने काही आंदोलक आतमध्ये शिरले. त्यावेळी कर्मचाऱ्यांकडून चप्पल आणि दगडफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आंदोलक एसटी कर्मचारी घरामध्ये घुसले असल्याचे लक्षात येताच खासदार सुप्रिया सुळे यांनी कर्मचाऱ्यांसोबत बोलण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांना अनेक वेळा शांततेचे आवाहन करण्यात आले. मात्र एसटी कर्मचाऱ्यांकडून जोरदार निदर्शने चालूच होती.
सुप्रिया सुळे यांनाही एसटी कर्मचाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.”सर्व एसटी कर्मचाऱ्यांशी मी चर्चा करण्यासाठी तयार आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी शांतता राखावी. मी आताच्या क्षणाला कर्मचाऱ्यांसोबत बोलायला तयार आहे. माझे आई-वडील आणि मुलगी घरामध्ये आहे. मला त्यांना भेटू द्या. त्यांची चौकशी करू द्या. त्यानंतर मी तुमच्याशी चर्चा करण्यासाठी तयार आहे ” असे भावनिक आव्हान वेळोवेळी सुप्रिया सुळे यांच्याकडून कर्मचाऱ्यांना करण्यात येत होते.