
पुणे : प्रतिनिधी
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारणात यावे, त्यासाठी मी त्यांना राजीनामा द्यायला लावला होता. त्यांनतर त्यांच्यासाठी विधानसभेचे तिकीट मागायला गेलो होतो. परंतू त्यांना त्यावेळी तिकीट नाकारण्यात आले. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचे सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
खासदार श्रीनिवास पाटील आणि ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांनी वयाच्या ८२ व्या वर्षात पदार्पण केले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभेच्या वतीने पुण्यातील बालगंधर्व सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पाटील व भावे यांना सन्मानित करण्यात आले.
सुशीलकुमार शिंदे, श्रीनिवास पाटील आणि शरद पवार यांच्यातील मैत्री सगळ्यांना माहीत आहे. सन्मान सोहळ्यात शिंदे आणि पाटिल यांना शरद पवार यांनी त्यांना राजकारणात कसे आणले याचा किस्सा सांगितला. पवार यांच्यामुळे आम्ही राजकारणात आलो, पण नंतर आम्ही त्यांना सोडले. असे असले तरी आमच्यातली मैत्री कायम असल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
शरद पवार प्रतिक्रिया देत म्हणाले की, तुम्ही जरी आम्हाला सोडले असेल तरी आम्ही त्यांना सोडले नाही. कारण तुम्ही गांधी-नेहरू यांच्या विचारावर चालणारे आहात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गांधी नेहरु यांच्या विचारांना मानणारा पक्ष आहे. डॉ. डी. वाय. पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.