औरंगाबाद : प्रतिनिधी
भाजपच्या रंगात भेसळ असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यावर आज भाजप नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचा रंग खरा असून निवडणुकीत कोणाचा रंग कसा असतो हे ठरते. याउलट दाऊदच्या माणसाला साथ दिली तेव्हाच शिवसेनेचा रंग फिका पडला असल्याची टीका त्यांनी केली.
दानवे यांनीदेखील राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दाऊदला मदत करणाऱ्या माणसाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या पायाला भोवरा आणि तोंडात साखर असावी, परंतु ठाकरे हे दाऊदला मदत करणाऱ्याची मदत करत आहेत. त्यांनी तात्काळ मलिक यांचा राजीनामा घ्यावा. मजबूरी का नाम महात्मा गांधी अशी शरद पवार यांची अवस्था झाली असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
कोणाचा रंग कसा आहे हे निवडणुकीत ठरते. दाऊदच्या माणसाला साथ दिली तेव्हाच शिवसेनेचा रंग फिका पडला. आगामी पंचवीस वर्ष भाजपा सरकार टिकणार असल्याचा दावा त्यांनी केला. दानवे यांच्या घरी आज धूलिवंदन आणि वाढदिवसाचा एकत्रित कार्यक्रम आज पार पडला. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सेनेसह राष्ट्रवादीवर खरमरीत टीका केली.