Site icon Aapli Baramati News

शरद पवार यांचे पीए सतीश राऊत अजितदादांबद्दल म्हणतात… काळाच्या पुढे असणारा विरळा नेता..!

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस झाला. अजितदादांना अनेक मान्यवरांनी विविध माध्यमातून शुभेच्छा त्यांच्या कार्यशैलीचा आणि राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतला आहे. ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक सतीश राऊत यांनी एक लेख लिहित अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

सतीश राऊत हे सातत्याने लेख, कवितेच्या माध्यमातून व्यक्त होत असतात.. रविवारी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत एक लेख लिहिला आहे. यामध्ये त्यांनी अजित पवार यांच्या कार्यपद्धतीचा आणि दिवसभरातील दिनचर्येचा उहापोह केला आहे. 

दादांची दिनचर्या..! 

असं म्हणतात की, बारामतीच्या पवारांना झोप कमी आणि कामाचा झपाटा जास्त ! साहेब आणि अजितदादा डोळ्यासमोर आणले की, ही म्हण तंतोतत खरी असल्याचे जाणवते. साहेब भल्या सकाळी उठून लोकांच्या भेटी-गाठी साठी तयार असतात हे सगळे जाणतात. काही जूनी माणसं सांगतात की, साहेबांनी कधी-कधी पहाटे दोन वाजता देखील वेळा दिल्या आहेत. असे म्हणतात की, पूर्वी निवडणूकींच्या काळात साहेबांचा थिंक टँक निवडणूकीच्या मोर्चेबांधणी साठी रात्री बसला की सकाळ उजाडली तरी उठत नसे.

सार्वजनिक जीवनात किती वाजता झोपता येईल याचा नियम नाही, उठणे मात्र आपल्या हाती असते.   भल्या सकाळी उठून कामाला लागण्याचा शिरस्ता हा अजितदादांचा उपजत गुण आहे. पुर्वेकडे तांबडं फुटण्याची वेळ झाली , आभाळात झुंजूमुंजू झालं की दादा झोपेतून उठतात. सकाळी उठल्यापासून दादा बरोब्बर ४५ मिनिटांत तयार होता. तुम्ही -आम्ही आपलं घड्याळ २ ते ५ मिनिटे पुढे लावतो, दादांचे घडयाळ  चक्क पंधरा मिनीटे पुढे  वेळ दाखवते. वेळ पाळण्याच्या बाबतीत काळाच्या पुढे असणारा हा असा विरळा नेता आहे. दादांमध्ये ही लष्करी शिस्त कुठून आली कुणास ठाऊक ! दादांची अंगकाठी तशी शेलकी, काटक आहे. ते दररोज व्यायाम करतात की ते ठाऊक नाही परंतू हल्ली चालण्याचा व्यायाम करतात हे ऐकले आहे. पण दिवसभराच्या धावपळीत त्यांचा खूप व्यायाम घडून येत असेल हे नक्की. साधारणत: साडेसहा वाजता न चुकता सगळे पेपर वाचन करून दादा हलका आणि बेताचा नाष्टा घेतात. खूप तिखट, मसालेदार आणि चमचमीत पदार्थ दादांना आवडत नाही.

नाष्टा संपला की, सकाळी ७ वाजता आपल्या निवासी कार्यालयात ते लोकभेटीसाठी सज्ज असतात. दादांना मुंबईत बारामतीचे काम घेऊन आलेले चालत नाही. ‘जिथले काम तिथल्या तिथे’ मार्गी लावण्याची त्यांची पद्धत आहे. मुंबईशी निगडीत काम असले तरच भेटणाऱ्याने मुंबईत यावे अन्यथा दादांची कडक भाषा पचनी पडायला हवी. दादा दर शुक्रवारी पुण्याला आणि शनिवारी-रविवारी बारामतीतील सहयोग निवासस्थानी असतात. बारामतीत त्यांच्या घराबाहेर लोकांची जत्रा भरलेली असते. कधी-कधी लोकांची रांग सहयोग सोसायटीबाहेर भिगवण रस्त्यापर्यंत शेकडे मीटर अंतरापर्यंत जाते. दादा फटाफट भेटतात आणि दणादण फोन लावतात. शेजारी पी.ए. मंडळी कानात जीव आणून दादांच्या सूचना ऐकण्यासाठी तयार असतात. पी.ए. ऐकण्यात चूकला किंवा त्याच्याकडून फोन लावण्यात दिरंगाई झाली की त्याला भल्या सकाळी घाम फुटल्याशिवाय राहत नाही.

दादा थेट जनसंपर्क असणारा, काही क्षण का होईना पण खात्रीने आणि सहज भेटणारा, काम होण्यासारखे असले की तात्काळ मार्गी लावणारा लोकाभिमूख नेता ( Mass Leader ) आहे. नेता भेटण्यासाठी दुर्मिळ असला की, डि.फॅक्टो लिडरशीप तयार होते. नेत्याच्या भोवतीचे कोंडाळे (Syndicate) आणि पी.ए. यांचे अनाकरण महत्व वाढते. पी.ए. संवेदनशील, सौजन्यशील व सहकार्य भावनेचा असेल तर ठिक नाहीतर त्यांना ‘चहापेक्षा किटली गरम !’ अथवा ‘झारीतील शुक्राचार्य’ अशा उपाध्या आपोआप मिळतात. साहेबांकडे आणि दादांकडे अशी डि.फॅक्टो. पद्धत कधीही रूढ झाली नाही कारण त्यांचा जनसंपर्क थेट आणि होणारी विनासायास भेट !

मी नेहमी म्हणतो, ‘साहेबांना पी.ए. हाकेच्या अंतरावर आणि दादांना हाताच्या अंतरावर लागतात !’ साहेब हातात आलेले कागद एकमेकांवर रचतात, थोडे जास्त झाले की, सफारी वेशातील पि.एस.ओ. करवी ते जवळच्या पी.ए.कडे पोचतात. महत्वाचे कागद असले की, साहेबांच्या देहबोलीवर दुरून लक्ष ठेवणारा पी.ए. लगबगीने पुढे येतो आणि कागदाबरोबर ज्या सूचना मिळतात त्या बरहुकूम पाळतो. दादांचे पी.ए.मात्र या कामासाठी दादांच्या मागे खुर्चीला लागून असतात. महत्वाचा अथवा निकडीचा अर्ज असेल तर दादा लागलीच संबंधित अधिकाऱ्याला फोन लावण्यास सांगतात. दादा जेव्हा भल्या सकाळी एखाद्या अधिकारी, आमदार -खासदार अथवा मंत्री महोदयांना फोन लावण्यासाठी सांगतात तेव्हा पलिकडच्या व्यक्तीच्या घरात सूर्य उगवला असेल की नाही याची भ्रांत असते. दादांना मात्र पलिकडून फोन उशीरा उचललेला चालत नाही. त्यामुळे सोबत असलेले दोन-तीन पी.ए. किंवा ओ.एस.डी. फोन लावण्याचा मोहिमेवर कामाला लागतात. दादा कार्यालयात असतील तेव्हा टेलीफोन ऑपरेटर या कामात सतत जुंपलेले असतात.

दादांचा जनता दरबार असा लोकांची झुंबड, कर्मचाऱ्यांची धावपळ आणि पी.ए. मंडळींची धांदल , आणि जनता -कार्यकर्त्यांची रेलचेल यांनी भरलेला असतो. दादांच्या उपस्थितीत वातावरणात तापमान जरा जास्त असले तरी त्यात एक जिवंतपणा आणि सळसळणारी उर्जा असते. दादा असतील तेथे मरगळ औषधलाही नसते.  

दादांच्या आवाजात दरारा हा ठरलेला. ! त्यांच्या रागात अनुराग असतो. एखाद्याला खवळले की त्याचे काम लवकर होते. झापला गेलेला घरी जाईपर्यंत त्याचे काम मार्गी लागेल याची काळजी दादा घेत असतात. बाहेरून कडक दिसणारे दादा आतून कमालीचे हळवे , संवेदनशील आहेत. त्यांच्या ठायी असलेला कळवळा वाणीतून दिसत नसेल पण कृतीतून सतत पाझरताना दिसतो. सृष्टीचा नियम आहे ‘एखाद्या फळाचा अंतर्भाग नाजूक, मृदू आणि गोड असेल तर त्याची साल अधिक कडक आणि टणक असते मग नारळ घ्या की फणस, कवट घ्या की अक्रोड !’ गोड बोलून , डिप्लोमॅटीक पद्धतीने काम टाळणाऱ्या , सिरिअसली न घेणाऱ्या नेत्यांपेक्षा तडकाफडकी निर्णय घेणारा, नसेल होत तर तोंडावर होत नाही म्हणून सांगणारा नेता कधीही चांगला. माणसाला उगीच आशेला लावणे, घोळत बसवणे, चकरा मारायला लावणे दादांच्या स्वभावात नाही. दादा कडाडले , गरम झाले तरी त्याचे काम होते, त्याला रिलिफ भेटतो. हा भेटणारा दिलासा एखाद्या मलमापेक्षा कितीतरी आल्हाददायक असतो.

दादांच्या दरबारी कर्तबगारीचा सन्मान होतो. पुढे-पुढे करणाराने दोन पावले मागेच राहावे. दादा अशी लांगूलचालन करणारी, चमको मंडळी अचूक हेरतात. त्यांचे काम नियमात असेल तर ऐकून घेतले जाईल पण निरर्थक, उलटसुलट असले की समजायचं चहा-नाष्ट्याबरोबर दादांचा वाणीप्रसाद मिळणार. दादांना हुजरेगिरीचा राग येतो. केवळ स्वार्थापायी अशी मंडळी जवळ येतात हे दादांना माहित आहे. ‘कुणी पायी पडू नये !’ म्हणून निवासस्थानी असणारी ठळक अक्षरातील पाटी लक्ष वेधून घेते. दादा रागावत असले तरी दूसऱ्याच्या स्वाभीमानाची कदर होते हेच ती पाटी सांगत असते.  

दादांच्या बैठका खूप ऑर्गनाईज्ड असतात. अधिकाऱ्यांना तयारी करून यावे लागते. बैठकीत दादा अतिशय काळजीपूर्वक ऐकतात, एखाद्या अधिकाऱ्याने एरंडाचे गुऱ्हाळ चालू केले की त्यांना आवडत नाही. नेमकं आणि मुद्देसूद बोलणं त्यांना आवडतं. अधिकाऱ्याने नियमात बोलावं पण प्रॅक्टीकल असावं अशी दादांची अपेक्षा असते. ‘नियम हे लोकांच्या समस्येची सोडवणूक करण्यासाठी असतात, अडवणूक करण्यासाठी नाही’ ही त्यांची भुमिका असते. अधिकारी नियमावर बोट ठेवून टाळू लागला, वेळ मारून नेऊ लागला की त्याला खडे बोल सुनावतात. प्रकरणाचा क्रक्स आणि जनतेची नस माहित असणारा हा नेता आहे. बैठकीत तोडगा काढण्यावर, तात्काळ निर्णय घेण्यावर त्यांचा भर असतो. पोकळ आश्वासने देणाऱ्याकडून भरीव कामे होत नाहीत. दादांची कामे भरीव अशी असतात. पण एखाद्या शिष्टमंडळाच्या मागण्या आणि अपेक्षा अवास्तव असल्यातर ते ‘होत नाही’ म्हणून स्पष्ट सांगतात.

दादांच्या कामाच्या पाहणीच्या वेळा, उद्घाटनांच्या वेळा यांच्या रंजक कथा आहेत. काही महिन्यांपूर्वी मतदारसंघातील पंदारे गावचे अशोक नानासाहेब जगताप त्यांच्या पेट्रोलपंपाच्या उद्धाटनासाठी वेळ घेण्यासाठी दादांकडे सकाळीच्या प्रहरी गेले. दादांनी संभाव्य दौरा-कार्यक्रम पाहिला आणि म्हटले ‘सकाळी साडेसहाची वेळ शिल्लक आहे, जमत असेल तर सांगा.’ झालं ठरलं , उद्धाटनाच्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता दादा पंपावर हजर ! दादांचा वक्तशीरपणा माहित असल्याने सकाळी सहा वाजल्यापासून पाच-सहाशे माणसे जागेवर हजर होती. अशी उगवत्या सूर्याच्या साक्षीने उद्घाटन होणारी आणखी खूप उदाहरणे देता येतील.

कार्यक्रम दिलेल्या वेळेतच सुरू झाला पाहिजे हा दादांचा दंडक असतो. तो कुणी मोडण्याचे धाडस करू नये. दादा वेळेआधी पोहोचू नयेत म्हणून संयोजक दादांच्या ताफ्याचा वेग कमी करण्यासाठी पोलिसांना कळवण्याची शक्कल लढवतात. पायलटने वेग मंदावल्याचे समजले तर दादा पायलटला ओव्हरटेक करून वेगाने पुढे जाण्यासाठी चालकाला फर्मावतात. दादा वेळे आधी पोचले तर संयोजकांच्या उरात धडकी भरते. दादा लोक येण्याची वाट पाहत नाहीत,वेळ झाली की कार्यक्रमाला सुरूवात करतात. एका कार्यक्रमाला उशीर झाला तर त्याचा दिवसभराच्या अन्य कार्यक्रमांवर परिणाम होतो हे त्यांना आवडत नाही. स्वागत-सत्कार, भाषणे लांबली की ते कार्यक्रमाची सुत्रे स्वत:कडे घेऊन सुत्रसंचालकाचं काम सोपं करतात. ‘हक्काच्या माणसांसमोर कसली आली औपचारिकता !’ हे त्यांचं सुत्र असतं.

दादा सार्वजनिक कामांची अनौपचारिक पाहणी सकाळची कोवळी उन्हं येण्याअगोदर किंवा रात्री दिव्यांच्या प्रकाशात गर्दी निवल्यानंतर करतात. एकदा जगरहाट सुरू झाली की वाहतूकीची कोंडी होऊन जनतेला त्रास नको ही त्यांची भूमिका असते. आणि अशा निरव , निश्चल वेळी कामे ही शांत पणे पाहता येतात.

दादांचा मुक्काम शासकीय विश्रामगृह किंवा हॉटेल मध्ये असेल तर तेथील राहण्याचे आणि जेवणखाण्याचे बील ते स्वत:च्या खर्चातून देतात. एकदा एक पी.ए. सातारा जिल्ह्यातील दौऱ्यात बील देण्याचे विसरला तर त्याला कोयनानगर येथे गाडीतून उतरवून कऱ्हाडमधील हॉटेलचे  बील अदा करण्यासाठी दूसऱ्या गाडीने पिटाळले होते. हिंगोलीचे राम वडकूते यांनी एकदा विश्रामगृहाचे बील दिल्याचे समजल्यावर दादां कडाडले होते आणि त्यांचे पैसे परत करण्यासाठी पी.ए.ला रवाना केले होते. एवढेच नव्हेतर पुण्यातील बापू पठारेंच्या कार्यक्रमाला गेले असता दादा दूपारी कपडे बदलण्यासाठी पठारेंच्या घरासमोरील एका हॉटेलात गेले आणि तेवढ्या दोन तासाचे सुद्धा बील त्यांनी अदा केले. 

याला अपवाद कुणा कार्यकर्ता अथवा संयोजकांच्या घरी पाहूणचार असेल तर ! कार्यकर्त्याच्या प्रेमाखातर असे सौजन्य स्विकारले जाते. दादांना आहारात बाजरीची भाकर विशेष आवडते. इतर पदार्थ कोलेस्ट्रॉल नसणारे, कमी तिखट व कमी तेलाचे असले की पूरे. जेथे जेवणाची व्यवस्था असेल तेथे  ऑनड्यूटी पी.ए. दादांसाठी जेवणापूर्वी हात स्वच्छ धुण्याकरीता डेटॉल व स्वच्छ नॅपकीन तयार ठेवतात. जेवण झाले की, दादा रात्री उशीरापर्यंतच्या वेळा देत नाहीत. शक्यतो लवकर झोपून उद्याचा पहिला नमस्कार सुर्यनारायणाला करून जनता-जनार्दनाच्या सेवेसाठी तत्पर राहण्यासाठी ते कटीबद्ध असतात.

दादांची अशी ऑन टाईम  दिनचर्या सुमारे पस्तीस वर्षांपासून अव्याहतपणे चालू आहे. सत्तेत असो वा नसो त्यात खंड कधी पडला नाही. तो त्यांच्या जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग झाला आहे. वक्तशीरपणा, मुद्देसूद विचार व मांडणी, अफाट ग्रहणशक्ती,  शिस्तप्रियता, स्पष्टोक्तपणा, प्रशासकीय कौशल्य , संवेदनशीलता, विकासकामातील सौंदर्यदृष्टी, गुणग्राहकता अशा अनेक गुणांमुळे सांप्रत राजकारणात दादांचे महत्व व त्यांना मिळणारा मान पक्षातीत आहे. दादांची ही निरिक्षणे मी दुरून हेरली आहेत. जवळून अनुभवली तर अजून बरेच काही लिहिता येईल.

दादांना वाढदिवसाच्या बिलेटेड शुभेच्छा ! आपणास सौख्य ,उत्तम आरोग्य व दीर्घायू लाभो ही सदिच्छा !( साभार- श्री.सुनील मुसळे, श्री. अनिल ढिकले दादांचे खाजगी पी.ए.)

@सतीश ज्ञानदेव राऊत


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version