
औरंगाबाद : प्रतिनिधी
ज्या विद्यापीठ नामांतरासाठी ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आपली सत्ता गमवावी लागली होती. त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने तब्बल ३२ वर्षानंतर शरद पवार यांना डि.लीट पदवी प्रदान करीत सन्मानित केले आहे. यावेळी पदवी दीक्षांत सोहळ्यात शरद पवार अत्यंत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
शरद पवार यांना पदवी देऊन त्यांचा गौरव करण्याअगोदर; त्यांच्या राजकीय, सामाजिक ,कृषी आणि शैक्षणिक कार्याचा आढावा देणारी एक डॉक्युमेंटरी सभागृहामध्ये सादर करण्यात आली. डॉक्युमेंटरी सादर करत असताना शरद पवार काही वेळासाठी अतिशय स्तब्ध झाले होते. त्यांचा चेहरा अत्यंत भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि विद्यापीठाचे कुलगुरू प्रमोद कुलगुरू यांच्या हस्ते शरद पवार यांना डि.लीट ही मानाची पदवी देऊन गौरविण्यात आले.
तसेच भाजप नेते केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाही डि.लीट पदवी देऊन विद्यापीठाकडून सन्मानित करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची तब्येत अस्वस्थ आहे. त्यासोबतच नितीन गडकरी यांची देखील तब्येत अस्वस्थ आहे. त्यामुळे दीक्षांत सोहळा कार्यक्रम रद्द होण्याची मोठी शक्यता वर्तवली जात होती. मात्र दोघांनीही कार्यक्रमास हजेरी लावून उपस्थितांना मार्गदर्शन केले.