मुंबई : प्रतिनिधी
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडी न्यायालयाने २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा पुढील मुक्काम मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात असणार आहे. मागील काही दिवसांपासून संजय राऊत ईडीच्या कोठडीत होते. न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे संजय राऊत यांना जामीनासाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे तूर्तास संजय राऊत यांना दिलासा मिळाला आहे.
संजय राऊत यांना मागील सुनावणीमध्ये ८ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. आज कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आज त्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता राऊत यांना जामीन मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे. तोपर्यंत संजय राऊत यांचा मुक्काम मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात असणार आहे.
पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांना १ ऑगस्ट ईडीने रोजी अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयाने ४ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती. ४ ऑगस्टला मुदत संपल्यानंतर संजय राऊत चौकशीसाठी सहकार्य करत नसल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांकडून न्यायालयात सांगण्यात आले. त्यामुळे पुन्हा संजय राऊत यांच्या ईडीच्या कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली होती.