मुंबई : प्रतिनिधी
शेतकऱ्यांचा वीज प्रश्न, भूमी अधिग्रहण कायदा, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या निधीत सरकारने घेतलेली भूमिका असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे सुटलेले नाहीत. महाविकास आघाडीने शेतकऱ्यांची सर्वच पातळीवर निराशा केली आहे. सत्तेत असूनदेखील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसतील तर, आमदारकीवर पाणी सोडण्यास तयार असल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी मांडली आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना राजू शेट्टी यांनी ही भूमिका मांडली. राजू शेट्टी म्हणाले, जर सत्तेत असूनही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसतील तर तशी सत्ता नकोच. महाविकास आघाडीच्या सरकारकडून शेतकऱ्यांची सर्वच पातळीवर निराशा झाली आहे. त्यामुळे आमदारकीवर देखील पाणी सोडण्यास तयार आहे.
भाजपाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या सर्वच योजना या नावे ठेवण्यासारख्या नाहीत. जिल्ह्याच्या मध्यवर्ती सहकारी बँका या शेतकऱ्यांच्या आहेत. परंतु त्यामध्ये देखील विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. सर्वपक्षीय नेते दरोडे घालणारे आहेत. अधिवेशनात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करायचे आणि इकडे भ्रष्टाचार करायचा असे यांचे सूत्र असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली.
पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे. त्यामध्ये विधानपरिषद आमदारकीबद्दल भूमिका मांडणार आहे. त्यानंतर माझा वैयक्तिक निर्णय घेणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली. त्यामुळे आता राजू शेट्टी महाविकास आघाडीतून फारकत घेतात का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.