
मुंबई : प्रतिनिधी
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची फसवणूक प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी केली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
याप्रकरणी आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी माता रमाई आंबेडकर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात दरेकर हे मजूर असल्याचे दाखवून मुंबई बँकेचे संचालक आणि अध्यक्ष झाले होते. त्यांनी मजूर असल्याचे दाखवत सरकार आणि ठेवीदारांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले होते.
दरम्यान, प्रवीण दरेकरांनी अटकेपासून संरक्षण मिळावे, तसेच कारवाई टळावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. ही याचिका फेटाळून लावत अटकपूर्व जामिनासाठी योग्य न्यायालयात जाण्याचेही सुचवले आहे.
दरम्यान, अटक टाळण्यासाठीची याचिका फेटाळल्यामुळे दरेकर यांच्यापुढील अडचणीत वाढ झाली आहे. एकीकडे केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सत्ताधारी नेते रडारवर आहेत. त्यातच आता दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिस या गुन्ह्यात नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.