मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची मोठी शक्यता आहे.शिवसेनेसोबत युतीबाबतच्या हालचालीही सुरू आहेत. अशातच महाविकास आघाडीचा दुसरा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेसनेही वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याबाबत संकेत दिले आहेत.
वंचित बहुजन आघाडीसोबतच्या युतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस कडून सकारात्मकता दर्शविण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना या युतीबाबत सकारात्मकता दाखवली आहे. मतांची विभागणी होऊ नये यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवं, अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करण्यास आमची तयारी असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
नुकतेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे एका कार्यक्रमानिमित्त एकाच मंचावर आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीला युतीबाबतची साद घातली होती. अशातच अजित पवार यांनीही वंचित बहुजन आघाडीसोबत युतीबाबत सकारात्मक दाखवली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत युती करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.