Site icon Aapli Baramati News

POLITICAL : ज्या भागानं संधी दिली; त्यांची काम करायचं सोडून ‘हा’ निघाला मोठा नेता व्हायला; कर्जत-जामखेडमध्ये अजितदादांनी सुनावले खडे बोल..!

ह्याचा प्रसार करा

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत जामखेड मतदारसंघात मागच्या वेळी आमच्या घरातलाच उमेदवार दिला. पण हा गडी ज्या भागानं निवडून दिलं, त्यांची कामं करण्याऐवजी मोठा नेता व्हायला निघालाय अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवार यांना खडे बोल सुनावले. आता हाच मोठा नेता व्हायला लागल्यावर पक्षातील इतर नेते तिकडे जाऊन काय करणार असं म्हणत संघर्ष यात्रेत शरद पवार गटातील नेत्यांच्या अनुपस्थितीवरून अजितदादांनी टोला लगावला.

अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ अजितदादांची कर्जत येथे सभा पार पडली. या सभेला खासदार सुजय विखे पाटील, आमदार राम शिंदे, उमेश पाटील, राजेंद्र नागवडे, मंगलदास बांदल, बाळासाहेब नहाटा, शेखर खरमिरे, बाळासाहेब शिंदे, बापूसाहेब नेटके, काकासाहेब तापकीर, प्रवीण घुले, अलाउद्दीन काझी, अशोक खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मागच्या निवडणुकीवेळी कर्जत-जामखेडमधून मी घरातलाच उमेदवार दिला. त्याला हडपसरमधून निवडणूक लढवायची इच्छा होती. मात्र जिल्ह्यात सगळ्यांनीच उभं राहून कसं चालेल. त्याला हडपसरला सासऱ्याची मते मिळतील, बाकीच्याचं काय होईल. जनतेची मिळवावी लागतात, तेव्हा कुठे निवडून येतो. त्यानंतर त्याला कर्जत-जामखेडमधून उमेदवारी दिल्याचं अजितदादांनी सांगितलं. हा आमदार झाल्यापासून ज्या भागानं निवडून दिलं, त्या भागाचे प्रश्न सोडवण्याऐवजी मोठा नेता व्हायला निघालाय, असंही अजितदादांनी सुनावलं.

उठसूठ कुठेही सभा घे. तर कुठं पुण्यावरून नागपूरला पायी यात्रा घेऊन गेला. आरं बाबा काय नडलंय.. मतदारसंघात लक्ष दे ना.. मतदारसंघातून यात्रा काढली असती तर हा आमदार प्रश्न समजून घेतो असं लोक म्हणाले असते. पण हा निघालाय मोठा नेता व्हायला. त्याच्या यात्रेत कुणीही बरोबर नव्हतं. जयंत पाटील तर मला म्हणाले, मी शेवटच्या सभेला जाईल आणि सुप्रियाही तिकडे गेली नाही. आता हाच मोठा नेता व्हायला लागल्यावर बाकीचे काय करणार अशा शब्दांत अजितदादांनी कर्जत-जामखेडच्या आमदाराला टोला लगावला.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version