मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. आजच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पहायला मिळालं. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत विरोधकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. ईडी सरकारचा निषेध असो; पन्नास खोके, एकदम ओक्के या घोषणा देत विरोधकांनी शिंदे सरकारवर शरसंधान साधले.
आज पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. कायदा सुव्यवस्था, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान अशा प्रश्नांकडे या आंदोलनातून लक्ष वेधण्यात आले.
आजच्या या आंदोलनात पन्नास खोके, एकदम ओक्के ही घोषणा चांगलीच गाजली. नव्या सरकारमधील मंत्री विधानभवनात जाताना महाविकास आघाडीच्या आमदारांनी ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’ अशा घोषणा देत विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. खातेवाटपात नाराज झालेल्या मंत्र्यांना चिमटे काढणाऱ्या घोषणाही यावेळी दिल्या गेल्या. एकूणच अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस विरोधकांच्या आक्रमकतेमुळे गाजल्याचं पहायला मिळालं.