मुंबई : प्रतिनिधी
सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून महाविकास आघाडीकडून आमदारांची जुळवाजुळव केली जात आहे. अशातच वरुड-मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार सांगतील त्यांनाच आपण मतदान करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीसह भाजपकडून निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. अपक्ष उमेदवारांच्या भूमिकेवर ही निवडणूक अवलंबून असल्याने अपक्ष आमदारांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सत्ताधारी व विरोधकांकडून होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांना मुंबईत बोलावण्यात आले आहे.
अपक्ष आमदारांची भूमिका काय याकडे लक्ष असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाजूला केलेले अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी स्पष्टपणे आपण महाविकास आघाडीलाच मतदान करणार असल्याचे सांगितले आहे. आपण आमदार झाल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आहोत. त्यांच्याकडून मतदारसंघातील विविध प्रश्नांना न्याय मिळतो. त्यामुळे ते सांगतील त्याच उमेदवारांना आपण मतदान करणार असल्याचे भुयार यांनी सांगितले.
या निवडणुकीत भाजपने अपक्ष आमदारांना गळ घालण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र देवेंद्र भुयार हा अजितदादांचा माणूस आहे हे माहिती असल्यामुळे भाजप आपल्यापर्यंत पोहोचली नसल्याचे त्यांनी सांगितले. काहीही असले तरी आपण अजितदादांनी सांगितलेल्या उमेदवारांना मतदान करणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.