बारामती : प्रतिनिधी
राहुल गांधी विनायक सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडी मोडीत निघेल असा इशारा कॉँग्रेसला दिला होता. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपले परखड मत व्यक्त केले आहे. जोपर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस या पक्षांच्या प्रमुखांचा आशिर्वाद आहे, तोपर्यंत महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
बारामतीत आज अजित पवार यांचा जनता दरबार पार पडला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भूमिका स्पष्ट केली. अशा प्रकारच्या चर्चेला अर्थ नसतो. राष्ट्रीय नेते शरदरावजी पवार, कॉँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांचे जोपर्यंत महाविकास आघाडीला आशिर्वाद आहेत, तोपर्यंत महाविकास आघाडीला किंचितही अडचण नाही, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
याचवेळी त्यांनी सावरकर यांच्यावरून सुरू असलेल्या वादावरही भाष्य केले. देशासह राज्यासमोर आज अनेक प्रश्न आहेत. असे असताना काहीतरी विषय उकरून काढून नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असेही मत अजित पवार यांनी व्यक्त केले. आज राज्यातील अनेक प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झालेला आहे. असे असताना त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.