मुंबई : प्रतिनिधी
दसरा मेळाव्याच्या जागेवरून शिवसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गट समोरासमोर उभे ठाकण्याच्या शक्यता असतानाच शिवाजी पार्क मैदानात उद्धव ठाकरे यांचाच दसरा मेळावा होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दोन्ही गटांकडून शिवाजी पार्क मैदानासाठी महिनाभर आधी अर्ज करण्यात आले होते. परंतु आता शिंदे गटाने शिवाजी पार्कवरील दावा सोडत दसरा मेळावा अन्यत्र घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेता येईल हे स्पष्ट झाले आहे.
मागील वर्षी शिवाजी पार्क मैदानावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात चांगलीच जुंपली होती. ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेत दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळवले होते. याही वर्षी हा संघर्ष होण्याची चिन्हे दिसत होती. विशेष म्हणजे शिंदे गट आणि ठाकरे गटांकडून महिनाभर आधी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज करण्यात आले होते. अशातच वेळ पडल्यास पुन्हा न्यायालयात जाण्याची मानसिकता ठाकरे गटाने ठेवली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार आमदार सदा सरवणकर यांनी आज सकाळी मुंबई महानगरपालिकेला शिवाजी पार्कसाठी दिलेला अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले. शिवाजी पार्कऐवजी आझाद मैदान किंवा क्रॉस मैदानात दसरा मेळावा आयोजित केला जाईल, असे सरवणकर यांनी स्पष्ट केले. आम्हाला कोणाशीही वाद घालायचा नाही. त्यामुळे आम्ही आमचा मेळावा अन्यत्र घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरवणकर यांनी सांगितले.
शिंदे गटाने शिवाजी पार्कवरील दावा सोडल्यामुळे आता ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मागील वर्षीप्रमाणे कोणताही वाद न होता शिवाजी पार्कचा प्रश्न निकाली निघाला आहे. मात्र महानगरपालिकेने अद्याप ठाकरे गटाला परवानगी दिलेली नाही. येत्या रविवारपर्यंत शिवाजी पार्क देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महानगरपालिका सूत्रांकडून देण्यात आली.