मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील राजकीय घडामोडींना मागील काही दिवसांत वेग आल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे अॅक्टीव्ह मोडमध्ये आले आहेत. त्यांनी शिंदे गटासह ठाकरे गटातील आमदारांना नोटिसा काढत येत्या सात दिवसांत उत्तर देण्याची सूचना केली आहे. त्यामुळे लवकरच याबाबत राहुल नार्वेकर यांच्याकडून निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड केलं. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदही मिळवले. हा सगळा वाद निवडणूक आयोगासह सर्वोच्च न्यायालयात दाखल झाला. सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वीच यावर निकाल देत आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. या निकालाला ९० दिवस पूर्ण होत असल्यानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे अॅक्टीव्ह झाल्याचे दिसत आहेत.
नार्वेकर यांनी ठाकरे व शिंदे गटाच्या आमदारांना नोटीसा काढत येत्या सात दिवसांत उत्तर देण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच उत्तर न दिल्यास अपात्रतेच्या कारवाईला सुरूवात केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे लवकरच आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.