
मुंबई : प्रतिनिधी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातून पुढे गेली आहे. महाराष्ट्रातून या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे राहुल गांधी यात्रेमध्ये व्यस्त पाहायला मिळाले. अशातही राहुल गांधी यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना फोन करून त्यांची विचारपूस केली आहे. यासंदर्भात स्वतः संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली.
संजय राऊत यांनी भावनिक ट्विट करत म्हटले, भारत जोडोत व्यस्त असुनही राहुल गांधी यांनी रात्री फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती, असे ते म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात ११० दिवस यातना दिल्या.याचे दु:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे.यात्रेत तो दिसतोय,अशा भावना संजय राऊत यांनी व्यक्त केल्या.
नुकतेच संजय राऊत यांना गोरेगाव पात्राचाळ घोटाळ्याप्रकरणी जामीन मंजूर झाला. तब्बल ११० दिवसानंतर संजय राऊत तुरुंगातून बाहेर आले. त्यानंतर अनेकांनी संजय राऊत यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली होती. संजय राऊत यांनी देखील तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. अशातच राहुल गांधीही भारत जोडो यात्रेत व्यस्त असताना देखील संजय राऊत यांना फोन करून त्यांची विचारपूस केली.
महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकमेकांचे सहयोगी पक्ष आहेत. त्या अनुषंगाने शिवसेनेचे युवा नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही भारत जोडो यात्रेमध्ये सहभाग नोंदवला. तसेच संजय राऊतही भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र ते भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत.