जुन्नर : प्रतिनिधी
मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला असून राज्यभर तीव्र आंदोलने होत आहेत. अशातच काही लोकप्रतिनिधींनी आरक्षणासाठी आपल्या पदाचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी आजच राजीनामा दिला. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांनी आरक्षणासाठी आपल्याला समाजाने सांगितल्यास राजीनामा देण्याची तयारी असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यानंतर राज्यभरात अन्नत्याग आंदोलन सुरू झाले असून राजकीय नेत्यांना बहुतांश ठिकाणी गाव बंदी करण्यात आली आहे. अशातच आज हिंगोलीचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनीही आपण कधीही राजीनामा द्यायला तयार असल्याचे म्हटले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समाज जे सांगेल ते करण्याची माझी तयारी आहे. उद्या समाजाकडून मला राजीनामा देण्यास सांगितले तर मी तोही द्यायला तयार आहे. माझा समाज सांगेल त्या दिशेने वाटचाल करण्याची माझी तयारी असून आरक्षणासाठी मला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला तरी माझी तयारी असल्याचे अतुल बेनके यांनी सांगितले आहे.
एकीकडे हेमंत पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आरक्षणासाठी राजीनामा देणारे अतुल बेनके हे पहिले आमदार ठरतात का याकडे आता लक्ष लागले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन तीव्र होत असतानाच आता आमदार-खासदारांनी राजीनाम्याचे अस्त्र हाती घेतल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.